30 November 2015

युवा विकास निधी

1.     युवा विकास निधी
2.     स्त्रोत : महान्यूज  
http://www.mahanews.gov.in/Home/HomeDetails.aspx?str=8FHcKAnYSzc=

युवा विकास निधी


भारतात एकूण लोकसंख्येच्या तुलनेत 40 टक्के लोकसंख्या युवकांची आहे. युवकामधीलऊर्जेचा विधायक उपक्रमांसाठी उपयोग करून घेतल्यास त्यातून सक्षम समाजाची संकल्पना अस्तित्वात आणता येणे शक्य आहे. मात्र असे करताना युवकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविणे, त्यांना कर्तव्याची जाणीव करून देणे, जागतिक स्तरावरील ज्ञान त्याला उपलब्ध करून देतांना त्याच्या व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य युवा धोरण-2012 अंतर्गत या सर्व बाबींचा विचार करण्यात आला आहे आणि युवक कल्याण विषयक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी युवा विकास निधी स्थापन करण्यासही मंजूरी देण्यात आली आहे.

या निधीच्या माध्यमातून युवा आणि युवा संस्थाना कल्याणकारी उपक्रम राबविण्यासाठी आणि या क्षेत्रातील संशोधनासाठी आर्थिक सहकार्य करण्यात येणार आहे. युवक कल्याण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या प्रतिभासंपन्न युवांना अधिक कार्य करण्याकरिता शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. विशेष उपक्रम राबविणाऱ्या शैक्षणिक संस्था, शासकीय-निमशासकीय विभाग आणि स्थानिक स्वायत्त संस्थांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. युवक कल्याण क्षेत्रात संशोधन किंवा आंतरराष्ट्रीय स्वरुपाचे प्रशिक्षण आदी बाबींसाठीदेखील सहकार्य करण्याचे उद्दीष्ट समोर ठेवण्यात आले आहे.

राज्यातील धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे मुंबई संस्था नोंदणी अधिनियम 1950 किंवा विश्वस्त संस्था नोंदणी अधिनियम 1860 अन्वये नोंदणीकृत संस्था आर्थिक साहाय्यास पात्र राहतील. तसेच महाराष्ट्रातील अधिवास प्रमाणपत्र धारण करणारे 15 ते 35 वयोगटातील युवादेखील आर्थिक साहाय्यास पात्र राहतील.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे अशा स्वरुपाच्या साहाय्यासाठी अर्ज करावा लागेल.क्रीडा संचालनालय या अर्जांची छाननी करून राज्य युवा विकास निधी संनियंत्रण समितीकडे अर्ज मंजूरीसाठी पाठवील. समितीमार्फत सर्वंकष विचार करून अर्ज मंजूर केला जाईल. राज्याचे क्रीडा मंत्री संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तर क्रीडा राज्यमंत्री उपाध्यक्ष असतील. समितीत क्रीडा व युवक कल्याण विभागाचे अतिरक्त मुख्य सचिव, आयुक्त / संचालक क्रीडा व युवक कल्याण आणि राष्ट्रीय पुरस्कारार्थींचे दोन प्रतिनिधी, सदस्य म्हणून असतील.

प्रारंभी या निधीसाठी राज्य शासनाचा 25 लक्ष रुपये वाटा राहणार आहे. त्यानंतर दरवर्षी आवश्यक तरतूद करण्यात येणार आहे. विविध औद्योगिक प्रतिष्ठाने किंवा वाणिज्यिक प्रतिष्ठानांमार्फत स्वेच्छेने देण्यात येणाऱ्या देणग्यांच्या माध्यमातूनही निधीचा स्त्रोत उभारला जाणार आहे. युवा विषयक कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रायोजकाच्या माध्यमातून निधी उभारला जाणार आहे.
युवा विकास निधीच्या स्थापनेमुळे युवा विषयक उपक्रमांना गती देणे शक्य होणार आहे. युवा पिढीतील प्रतिभेचा शोध घेतांना त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आवश्यक उपक्रमांना या निधीच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ मिळणार आहे. शिवाय या क्षेत्रात कार्य करणारे युवा आणि विविध संस्था यांनादेखील प्रोत्साहन मिळणार आहे.
लेखक : जिल्हा माहिती कार्यालय, रत्नागिरी



स्त्रोत : महान्यूज  http://www.mahanews.gov.in/Home/HomeDetails.aspx?str=8FHcKAnYSzc=

SHARE THIS

Author:

0 comments: