31 December 2015

शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजना


1.       योजनेसाठी अर्ज सादर करताना खालीलप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे
2.       याशिवाय वैधानिक बाबी व कागदपत्रे म्हणून पुढीलप्रमाणे पूर्तता करणे आवश्यक आहे

कोकण विभागातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील जनतेचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच त्यांचा आर्थिक स्तर उंचवावा यासाठी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ मर्यादित यांच्या मार्फत अर्थसहाय्य करणाऱ्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांमुळे संबंधित लाभार्थ्यांना फायदा होऊन त्यांचा आर्थिक स्तर पर्यायाने सामाजिक स्तर उंचावण्यास निश्चितच चालना मिळू शकते.
इतर मागासवर्ग घटकांतील नागरिकांची प्रगती साधण्यासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. त्यानुसार 18 ते 50 वर्षे यादरम्यान वय वर्षे असलेल्या संबंधित लाभार्थ्यांसाठी राज्य महामंडळामार्फत 25 हजार रुपयांची थेट कर्ज योजना, 20 टक्के बीज भांडवल योजना तसेच नवी दिल्ली येथील राष्ट्रीय मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळाच्या 45 टक्के मार्जिन मनी योजना, महिलांसाठी स्वर्णिमा योजना, मुदती कर्ज योजना, सूक्ष्म पतपुरवठा योजना, महिला समृद्धी योजना तसेच शैक्षणिक कर्ज योजना इत्यादी योजना राबविल्या जात आहेत.
त्यादृष्टीने नारळ विक्री, किराणा दुकान, मेणबत्ती बनविणे, फळ विक्री, फिरता विक्री व्यवसाय, मच्छी विक्री तसेच अन्य तांत्रिक लघु व्यवसाय यासारख्या कायदेशीर किरकोळ व छोट्या स्वरूपातील व्यावसायासाठी तसेच बँकेमार्फत कर्ज मंजूर न करता येणाऱ्या अडचणी व कर्ज वितरणास होणारा विलंब टाळण्यासाठी राज्य महामंडळाची 25 हजार रुपयांची थेट कर्ज योजनाही एक महत्वाची योजना आहे. या योजनेचा व्याजदर हा दरसाल दर शेकडा 2 टक्के इतका माफक असून संबंधित लाभार्थी त्रैमासिक हप्ता याप्रमाणे तीन वर्षांत धनादेशाद्वारे अथवा रोखीने कर्जाची परतफेड करू शकतात.


योजनेसाठी अर्ज सादर करताना खालीलप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे

  • तहसीलदार किंवा नायब तहसीलदार यांनी दिलेला उत्पादनाचा मूळ दाखला.
  • ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थींच्या कुटुंबाचे सर्व मार्गाने वार्षिक एक लाखांपर्यंतचे मर्यादित उत्पन्न.
  • सक्षम अधिकाऱ्याने दिलेले इतर मागासवर्गीय जातीचे प्रमाणपत्र.
  • शिधापत्रिकेची छायांकित प्रत तसेच निवडणूक ओळखपत्र किंवा आधार कार्डाची छायांकित प्रत.
  • पासपोर्ट आकाराचे दोन फोटो.
  • वयाच्या पुराव्यासाठी शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र किंवा जन्म तारखेचा दाखला.
  • विशिष्ट ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या लाभार्थीकरिता व्यवसाय स्थळाची भाडेपावती करारनामा व सात/बाराचा उतारा
  • बँकेच्या बचत खात्याच्या पासबुकाची छायांकित प्रत.
याप्रमाणे कागदपत्रे सादर करावीत. तथापि मूळ प्रमाणपत्रे अर्जासोबत न जोडता त्याच्या स्वसाक्षांकित छायांकित प्रत्येकी दोन प्रती जोडाव्यात. मूळ प्रमाणपत्रे पडताळणी करताना दाखवावी लागतात.

याशिवाय वैधानिक बाबी व कागदपत्रे म्हणून पुढीलप्रमाणे पूर्तता करणे आवश्यक आहे

  • कर्जदाराला दोन जामीनदार द्यावे लागतील. यापैकी एक साधा जामीनदार तर एक जामीनदार हा शासकीय/निमशासकीय/सहकार क्षेत्रात कार्यरत वेतन चिठ्ठीधारक असणे आवश्यक आहे. अथवा कर्जदार किंवा जामीनदार यांच्या स्थावर मालमत्तेचे (सात/बारा किंवा आठ अ) कर्ज रकमेचा बोजा नोंद केला जाईल.
  • विहित नमुन्यातील करारनामा अथवा शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर जामीनपत्र.
  • लाभार्थीच्या बचत खाते असलेल्या बँकेचे धनादेश पुस्तक.
  • नमुना क्र. 8 9 हे 1 रूपयेच्या रेव्हेन्यू स्टम्प वर.
याशिवाय शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ मर्यादित यांच्यावतीने राबविली जाणारी 20 टक्के बीज भांडवल योजना ही देखील एक महत्वाची योजना असून प्रकल्प मर्यादा 5 लाख, महामंडळाचे बीज भांडवल 20 टक्के, बँकेचा सहभाग 75 टक्के, लाभार्थी सहभाग 5 टक्के, महामंडळाच्या कर्जावरील व्याज 6 टक्के व बँकेच्या रकमेवरील व्याज बँकेच्या दराप्रमाणे तर कर्ज परतफेड कालावधी 5 वर्षे असे या योजनेचे स्वरूप आहे.
सदर बीज भांडवल योजना तसेच नवी दिल्ली येथील राष्ट्रीय मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळाच्या 45 टक्के मार्जिन मनी योजना, महिलांसाठी स्वर्णिमा योजना, मुदती कर्ज योजना, सूक्ष्म पतपुरवठा योजना, महिला समृद्धी योजना तसेच शैक्षणिक कर्ज योजना इत्यादी योजनांसाठी अर्जदार लाभार्थ्यांची अर्हता पुढीलप्रमाणे आहे.
  • इच्छुक लाभार्थी हा इतर मागासवर्गीय असावा तसेच तो महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवाशी असावा.
  • तो कोणत्याही बँकेचा वा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
  • ग्रामीण व शहरी भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा कमी असावे.
  • राष्ट्रीय महामंडळाच्या सर्व योजनांसाठी ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 81 हजार रूपयांपेक्षा कमी व शहरी भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 1.03 लाखांपेक्षा कमी असावे.
  • या योजनांकरिता कर्ज रकमेवर 6 टक्के व्याजदर व महिलांना 5 टक्के व्याजदर राहील.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त संबंधित लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ मर्यादित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, सिंधुदुर्ग येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक नि. व. नार्वेकर यांनी केले आहे.

कर्ज मागणी अर्ज

 http://www.msobcfdc.gov.in/Download#modal2



- अर्चना जगन्नाथ माने,
माहिती सहायक, सिंधुदुर्ग.



SHARE THIS

Author:

0 comments: