31 December 2015

आमदार आदर्श ग्राम योजना

केंद्र शासनाच्या सांसद आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने महाराष्ट्रातही आमदार आदर्श ग्राम योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील विधानसभा आणि विधान परिषदसदस्यांना देखील आपल्या मतदारसंघातील तीन ग्रामपंचायतीची निवड करुन त्यांचा आमदार आदर्श ग्राम योजनेत समावेश करता येईल. राज्य शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेविषयी थोडक्यात माहिती.



 
आमदार आदर्श ग्राम योजनेच्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये या योजनेची अंमलबजावणी सर्वसाधारणपणे सांसद आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवरच करण्यात येणार आहे. प्रत्येक आमदारांना त्यांच्या मतदारसंघातून जुलै 2019 पर्यंत तीन ग्रामपंचायती आदर्श ग्राम म्हणून विकसित करता येतील. आमदार आदर्श ग्राम योजनेसाठी आमदारांकडून निवडण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या किमान एक हजार असावी, मात्र आमदारांना आपले स्वत:चे वा आपल्या पतीचे/पत्नीचे गाव निवडता येणार नाही. विधानसभा सदस्यांचा मतदारसंघ जर शहरी आणि ग्रामीण भागात विभागला गेला असेल तर ते मतदारसंघाच्या ग्रामीण भागातून ग्रामपंचायतीची निवड करतील. विधानसभा सदस्यांचा मतदारसंघ जर संपूर्णपणे शहरी असेल तर त्यांच्या सोयीच्या दृष्टीने त्याच जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीची निवडकरु शकतील. मुंबई परिसरातील शहरी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे विधासनभा सदस्य राज्यातील कोणत्याही ग्रामपंचायतीची निवड करु शकतील. विधानपरिषद सदस्य त्यांच्या इच्छेनुसार कोणत्याही जिल्ह्यातून ग्रामपंचायतीची निवड करु शकतील.

आमदार आदर्श ग्राम योजनेत केंद्र व राज्य शासनाच्या अस्तित्वात असलेल्या विविधयोजनांच्या कृतिसंगमाद्वारे अंमलबजावणी करण्यात येईल. निवडलेल्या ग्रामपंचायतीमध्ये आमदार निधीतून घेण्यात येणाऱ्या अनुज्ञेय असलेल्याकामासाठी राज्य शासनाकडून जोड निधी देण्यात येईल, याबाबत मार्गदर्शक सूचना शासनस्तरावरुन स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येत आहेत. भारत सरकारच्या www.saanjh.gov.in या संकेतस्थळाच्या धर्तीवर आमदार आदर्श योजनेच्या प्रभावी संनियंत्रणासाठी राज्यस्तरावर वेब पोर्टलची निर्मिती करण्यात येईल. राज्यात या योजनेच्या अंमलबजावणीकरिता ग्रामविकास विभाग समन्वय विभाग म्हणून काम करील. या योजनेच्या व्यवस्थापनाकरिता येणारा प्रशासकीय खर्च ग्रामविकास विभागाच्या राज्य योजनेतंर्गत उपलब्ध नियतव्ययामधून जास्तीत जास्त 0.5 टक्के मर्यादेमध्ये भागविण्यात येईल.

आमदार आदर्श ग्राम योजनेंतर्गत प्रामुख्याने ग्रामस्थांमध्ये उत्तम आरोग्य आणि स्वच्छतेच्या सवयी विकसित करणे, बालके व महिलांमधील कुपोषणाविषयी जाणीव जागृती आणि प्रबोधनास प्राधान्य दिले जाईल. गावकऱ्यांमध्ये व्यसनांचे दुष्परिणाम (दारु, तंबाखू, इ. सेवन) याबाबत जागृती करुन सुदृढ आरोग्याच्यासवयी विकसित करण्यासही प्राधान्य दिले आहे. सर्वांना किमान दहावी पर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देणे. सामाजिक एकोपा व शांतताप्रिय सहजीवन असणारे ग्रामीण वातावरण तयार होण्यासाठी गावातील गुन्हेगारी, बेकारी, लिंग भेदभाव इत्यादी दूर करुन युवक व स्वयंसहाय्यता समुहांचे ग्रामविकासात योगदान घेणे. गावाचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी शेतीसंबंधातील सेवांचा दर्जा उंचावणे, पशुसंवर्धन, पाणलोट विकास, लघु-ग्रामोद्योग व बँक क्षेत्रातील विविध सेवा-सुविधा उपलब्ध करुन देणे.युवकांना कौशल्यवृद्धी प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार व स्वयंरोजगारांच्या संधी उपलब्ध करुन देणे. युवकांमध्ये ग्रामीण विकासासाठी संघटनात्मक कौशल्याची वृद्धी करणे. गावामध्ये सुसज्ज ग्रामपंचायत भवन, उत्तम दर्जाचे रस्ते, पुर्णवेळ वीज, अन्य सार्वजनिक सेवा-सुविधा इंटरनेट सुविधा इत्यादीपायाभूत सुविधा विकसित करणे. गावाच्या पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड, सार्वजनिक धन कचऱ्याचे व्यवस्थापन तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन व संवर्धन करणे. निवडलेल्या ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता विषयक विविध कार्यक्रम जसे घनकचरा विल्हेवाट, सेंद्रीय कचऱ्याचे कंपोस्टिंग करुन खत वापरण्याची योजना इत्यादी कार्यक्रम प्राधान्याने राबविण्याचे ध्येय बाळगण्यात आले आहे. तसेच संबंधीत ग्रामपंचायतीत सांड पाण्यावर प्रक्रिया करुन होणारे शुद्ध पाण्याचा फेरवापर शेतीसाठी करण्यात येईल.

कोल्हापूर जिल्ह्यात आमदार आदर्श ग्राम योजनेची प्रभावी आणि परिणाम कारक अंमलबजावणीकरण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला असून जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांना आमदार आदर्श ग्राम योजनेंतर्गत करावयाच्या उपाययोजना विषयी सूचित करण्यात आले आहे. आमदारांनी त्यांच्या मतदा संघातील सूचविलेल्या तीन गावांमध्ये सर्वच प्रशासकीय यंत्रणामार्फत करावयाच्या विकास तसेच अन्य कल्याणकारी कामांचा सूक्ष्म कृती आराखडा तयार करण्यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणांच्या प्रमुखांना दिल्या आहेत. जिल्ह्यात आमदार आदर्श ग्राम योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुरु असलेले नियोजन पाहता आमदार आदर्श ग्राम योजना जिल्ह्यात यशस्वी होईल, यात मात्र शंका नाही.

एस.आर.माने
माहिती अधिकारी, कोल्हापूर.
माहिती स्त्रोत : महान्युज

SHARE THIS

Author:

0 comments: