31 December 2015

अटल पेन्शन योजना

अटल पेन्शन योजना ही निवृत्ती नंतर दरमहा ठराविक परतावा देणारी एक सरकारी पेन्शन योजना आहे. ही योजना मुख्यतः असंघटित क्षेत्रातील नागरिकांसाठी, ज्यांच्यासाठी कुठलीही पेन्शन योजना उपलब्ध नाही, अशासाठी लाभदायक आहे. बँका व पेन्शन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण यांच्या सहयोगाने ही योजना कार्यान्वित होणार आहे. 


18 ते 40 वयोगटातील असंघटित क्षेत्रातील सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतील. 18 वर्षे वयाच्या व्यक्तीने दरमहा 42 रूपये भरल्यास या व्यक्तीला वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर एक हजार रूपये दरमहा पेन्शन मिळू शकेल. याच धर्तीवर दरमहा 210 रूपये भरल्यास पाच हजार रूपये दरमहा पेन्शन मिळू शकेल. दर महिन्याचे योगदान बचत खात्यातून परस्पर नावे टाकण्याची सोय आहे.

या योजनेत ग्राहकाच्या योगदानाबरोबरच पहिली पाच वर्षे (2015-16 ते 2019-20) सरकारचेही योगदान राहणार आहे. हे योगदान ग्राहकाच्या एकूण योगदानाच्या 50 टक्के किंवा एक हजार रूपये यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढी असणार आहे. ज्या ग्राहकांसाठी कुठलीही वैधानिक सामाजिक सुरक्षा योजना उपलब्ध नाही आणि जे ग्राहक आयकर दाते नाहीत अशाच ग्राहकांना हे योगदान मिळणार आहे. ग्राहकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी किंवा पतीस ही पेन्शन चालू राहील. दोघांचाही मृत्यू झाल्यास त्यांनी नामांकित केलेल्या व्यक्तीस सर्व जमा रक्कम एक रकमी परत करण्यात येणार आहे.

SHARE THIS

Author:

0 comments: